नवी दिल्ली : नीट पेपर लीक आणि देशातील नामांकित परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात आज देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे. सोशल मीडियावरून रस्त्यावर उतरलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे जंतर-मंतर मैदानावर पहिले अधिकृत आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनात देशभरातून आलेले हजारो तरुण आणि विद्यार्थी सहभागी झाले असून संपूर्ण परिसर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या घोषणांनी दणाणून गेला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व स्वत: अभिजीत दिपके करीत आहेत.
शनिवारी सकाळी ७:४५ वाजता अमेरिकेतून दिल्लीत दाखल झालेले संस्थापक अभिजीत दिपके तब्बल दीड तास विमानतळाच्या आत अडकले होते. अखेर सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण करून जेव्हा ते विमानतळाबाहेर आले, तेव्हा त्यांनी सर्वात आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक हातात उंचावून दाखवले. हातात देशाचा तिरंगा आणि आंबेडकरांचे पुस्तक घेऊन ते थेट जंतर-मंतर आंदोलनाकडे रवाना झाले.
या आंदोलनाला अखेर दिल्ली पोलिसांनी अधिकृत परवानगी दिली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे अमेरिकेतून भारतात दाखल झाले असून, त्यांच्या आगमनासोबतच संघटनेला हे पहिले मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार, ६ जून (शनिवार) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जंतरमंतरवर हे आंदोलन करता येणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी स्वतः ट्विट करून समर्थकांना माहिती दिली. पोलिसांनी परवानगी दिली आहे. समर्थकांनी जंतरमंतरवर एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आयकर विभागाच्या कार्यालयाबाहेर रोखले!
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतून सकाळी ७:४५ वाजता दिल्लीत उतरलेल्या अभिजीत दिपके याला दिल्ली विमानतळावरील आयकर विभागाच्या कार्यालयाबाहेर थांबवून ठेवण्यात आले होते. विमानतळावरील सुरक्षा आणि सीमाशुल्क अधिकार्यांनी दिपके याला गराडा घातला होता. अधिकारी त्यांना गराडा घालून उभे असताना दिपके मात्र सातत्याने कोणाशीतरी फोनवर गंभीर चर्चा करत असल्याचे दिसून आले. सुमारे दीड तासांच्या विलंबानंतर त्याला विमानतळाबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.
दरम्यान विमानतळाबाहेर येताच त्याने अत्यंत आक्रमक भूमिका घेत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देशातील पेपर लीक आणि परीक्षांमधील घोटाळ्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या प्रचंड नैराश्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. दिल्लीत दाखल होताच अभिजीत दिपके याने परीक्षांमधील गैरव्यवहारामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला. नीट आणि इतर परीक्षांमधील घोटाळ्यांमुळे धास्तावलेल्या ५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत त्याने शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.